तारकांस पाहून
सुनिल नभ हे सुंदर नभ हे , नभ हे अतल अहा
सुनिल सागर, सुदर सागर सागर अतलचि हा
नक्षत्रांही तारांकित हे नभ चमचम हासे
प्रतिबिंबांही तसा सागरहि तारांकित भासे
नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई
नभानभात जल तें जलात नभ तें संगमुनी जाई
आकाशीचे तारे सागरि प्रतिबिंबित होती
किंवा आकाशी हे बिंबित सागरिचे मोती
किंवा आकाशचि हें सगळें, की, सागर सगळा
भवसागर बोलती पुराणी प्रथित ऋषी ज्याला !