गण – सदया गणया तार
हे सदया गणया तार । तुझ्यावरि भार
तूं मायबाप आधार । तुझ्यावरि भार
किति देश-शत्रु भूतली
हृच्छत्रु सहाही परी
शापे वा सुशरें जाळी
तो ब्राह्मण आता खाई परक्या लाथांचा बा मार १
देशावरि हल्ला आला
पुरुष तो लढोनी मेला
स्त्री गिळी अग्निकाष्ठाला
रजपूत परी त्या परवशतेचें भूत पछाडी, तार २
अटकेला झेंडा नेला
रिपु-कटका फटका दिधला
दिल्लीचा स्वामी झाला
तो शूर मराठा पाहि तयाचे खाई न कुतरें हाल ३
– नाशिक, १९०२