poem010

 

पोवाडा

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवति! त्वामहं यशो-युतां वंदे||
स्वतंत्रते भगवति! या तुम्ही प्रथम सभेमाजी
आम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडा आजी||
जय स्वतंत्रतेचा बोला
जय राष्ट्रदेविचा बोला
जय भवानी की जय बोला
तुम्ही मावळे बोला हरहर महादेव बोला
चला घालु स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला||
धन्य शिवाजी तो रणगाजी धन्य तानाजी|
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी||
प्रभात झाली वाद्ये झडली मुहूर्त लग्नाचा|
बोहल्यावरी उभा राहिला सुत तानाजीचा||
घटिका पात्रे मोजुनी द्विजगण शेवटल्या घटिला|
दंगल मोडुनी मंगल व्हाया सावधान वदला||
वदला द्विज परि कुणी भेटाया तानाजीस आला|
आला तो तो तलवारींनी मंडप खणखणला||
तो हर हर एकचि झाला|
हरहर महादेव| हरहर महादेव |
चमकता भाला| वदति रे चला|
शिवराज दूत पातले|
हे लग्न राहू द्या भले|
देशार्थ जनन आपुले|
धर्मार्थ जनन आपुले|
एक एक निघे मऱ्हाटा पुढती तानाजी|
प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ||
दरड उभट बहु चढणे दुर्घट घोरपडीलाही |
म्हणुनी पहारा जिथे गड़ावरि मुळी नव्हता काही||
साधुनी संधी ही तानाजी तिथे नीट आला|
चढाया, नव्हे हवेमधी उडण्याला झाला||
कुणी गुणगुणला पाय घसरता अहा काय होई |
वदे शूर देशार्थ मरोनी स्वर्गा तरी जाई||
तानाजी चढू लागले|

सद्भाग्य चढू लागले|
स्वातंत्र्य चढू लागले|
सांभाळी रे म्लेंच्छा आला आला तानाजी|
प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ||
एकमागुनी एक मराठा सरसर वरि चढला |
सहस्त्रावरि असुनीही रिपू चढविती ते हल्ला||
खाली वरती, मागे पुढती आजुबाजूनी|
सैरावैरा पळता पाडिती भाला भोसकुनी||
कल्याणाचे दार धडाडे| झाली रे बाजी|
प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी||
बाजी झाली परि तो आहे तानाजी|
मारित हाणित छाटित रमला रणांगणामाजी ||
उदयभान तो दिसला धरिला घे घे मार उठे|
झुंज झुंजता नजरा फिरल्या गर्जे सिंह पुढे ||
गर्जुनी पुनरपी तुटोनी पडला जरि तो श्रमलेला|
उदयभानुचा वार मर्मिचा अवचित तो बसला ||
मूर्च्छना अहा पातली| क्षणाभीतरी| वीररसशाली|
तानाजी खाली बघा येतो|
हा धैर्यमेरु उन्मळतो|
शिवकरिचा भाला गळतो|
भूमातेच्या अंकावरती पहुडे तानाजी|
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी||
गड आला सिंह हरपला अमुचा तानाजी||
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ||

Back to song list