शस्त्रगीत
व्याघ्र-नक्र-सर्प-सिंह-हिंस्त्र-जीव-संगरी
शस्त्रशक्तिने मनुष्य हा जगे धरेवरीं
रामचंद्र चापपाणि चक्रपाणि श्रीहरी
आर्तरक्षणार्थ घेति शस्त्र देवही करी
शस्त्र पाप ना स्वयेंचि, शस्त्र पुण्य ना स्वयें
इष्टता अनिष्टताहि त्यास हेतुनेच ये
राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र धर्म्य मानितें जरी
आंग्ल, जर्मनी, जपान राष्ट्र राष्ट्र भूवरी
भारतातची स्वदेशरक्षणार्थ कां तरी
शस्त्र-धारणीं बळेचि बंध हा अम्हांवरी?
शस्त्र-बंधनें करा समस्त नष्ट ह्या क्षणा
शस्त्र-सिद्ध व्हा झणी समर्थ आर्त-रक्षणा
व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना
नव्या पिढीस द्या त्वरें समग्र युद्धशिक्षणा!
– पुणे, १९३८