रानांत चुकलेले कोकरू
कां भटकसि येथें बोलें ? कां नेत्र जाहले ओले ?
कोणि कां तुला दुखवीलें ? सांग रे || १ ||
धनि तुझा क्रूर कीं भारी | कां माता रागें भरली ?
का तुझ्यापासुनी चुकली ? सांग रे || २ ||
गोजिरें कोंकरूं काळें | नअु दहा दिनांचे सगळें
अुचलोननि घेतलें कडे | चिमुकले गोजिरें || ३ ||
गृहि माझ्या तुझियासाठी | आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी | कां बरें || ४ ||
तव माता क्षणभर चुकली | म्हणुनि कां तनु तव सुकली
माझीही माता नेली | यम करें || ५ ||
हळू दुध थोडकें प्यालें | मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरूं बावरून गेलें | साजिरें गोजिरें || ६ ||
स्वातंत्र्य जयांचे गेलें | परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनी सुख न त्यां कसलें | कीं खरें || ७ ||
लटकून छातिशीं निजलें | तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें | रविकरें || ८ ||
घेअुनी परत त्या हातीं | कुरवाळित वरचेवरती
कालच्या ठिकाणावरती | सोडिलें || ८ ||
तों त्याची माता होती | शोधीत दूर शिशुसाठीं
दगडाचें तरुंचे पाठीं | हाय रे || ८ ||
हंबरडे ऐकूं आले | आनंदसिंधू अुसळले
स्तनिं शरासारखें घुसलें | किति त्वरें || ९ ||
हे प्रभो हर्षविसि यासी | परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपवविसी | सांग रे || १० ||- नाशिक, १९००